रोज उठून तेच-तेच प्रश्न
मनात घर करतात,
सर्वच नाहीत पण किमान
गोष्टी तरी सर्वांना का नाही मिळतात?
एकीकडे इतके कपडे आहेत
कि कोणते घालू म्हणून गोंधळ,
तर दुसरीकडे काय घालायचे याची विवंचना....
एकीकडे माणसे कमी आणि
घरासमोर महागड्या गाड्या असंख्य,
तर दुसरीकडे फाटके
आभाळ हेच घर...
एकीकडे ब्रांडेड शूज
आणि चप्पल्स साठी हट्ट,
तर दुसरीकडे अनवाणी
पायांनी जीवनाचे थैमान...
एकीकडे दिवसाचे हजारो
रुपये खाण्यावर उडवणारे,
तर दुसरीकडे त्यांच्या
उष्ट्या अन्नावर जगणे...
एकीकडे शाळेसाठी लाखो
रुपये डोनेशन भरणारे,
तर दुसरीकडे पाटी आणि पेन्सील चीही नाही कुवत....
एकीकडे दारूचा महापूर,
तर दुसरीकडे साध्या
पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन-मैल वणवण...
का आहे हा एवढा विरोधाभास,
कोण आहे याला जबाबदार?
एकीकडे सधन आणि सशक्त,
तर दुसरीकडे भकास,
ओसाड पडीक माळरान....
साला, आपल्याला काय
करायचेय म्हणून स्वतःला रोज समजावण्याचा प्रयत्न करतोय,
पण सकाळी उठल्यापासून
रात्री झोपेपर्यंत तेच समोर नाचत असेल,
तर मनाची खोटी समजूत
तरी कशी काढू?
वैतागते मन हे सगळे
पाहून, आणि त्याहून जास्त वैताग येतो याचा कि,
साला, मी काही करू
शकत नाही....
पराजित सैनिकासारखा
खाली मान घालून जगण्याशिवाय,
साला, मी काही करू
शकत नाही....
समोर जे चाललाय ते
कळत असूनही डोळ्यावर कातडी ओढून घेण्याशिवाय,
साला, मी काही करू
शकत नाही....
मित्र म्हणतात कि प्रसाद,
तू नेहमी दुःखच का लिहित असतोस?
पण जगात एवढे दुःख
दिसत असताना ते लिहिण्याशिवाय,
साला... मी काही करू
शकत नाही....
- प्रसाद कुलकर्णी
No comments:
Post a Comment