Tuesday, 4 August 2015

शाळा अन मी....

ऑफिसच्या शेजारीच एक शाळा आहे. खिडकीचा पडदा जरा बाजूला सारला कि मैदानावर खेळणारी पोरं दिसतात आणि मी नकळत भूतकाळात हरवून जातो...
शाळेत २ किंवा ३ फुटबॉल असायचे. त्यातही एखाद-दुसरा पंक्चर असायचा. 'पीटी' चा तास सुरु झाला रे झाला कि आम्ही स्टोअर रूम वर आक्रमण केल्यासारखे तुटून पडायचो... मैदानावर आले कि 'बारामती' विरुद्द 'भिगवण' अशा दोन टीम मध्ये वर्ग एका मिनिटात आपो-आप विभागाला जायचा आणि सुरु व्हायचे एक 'थैमान' !!!
चौथ्या मजल्यावरून मी त्या मुलांकडे एकटक बघत राहतो. बारीक-सारीक आठवणी मनात 'खेळायला' लागतात आणि तेवढ्यात आवाज येतो, "चल पिके, बिझनेस सोबत कॉल आहे. काम अर्धवट राहिले आहे".

क्षीरसागर madam

आई-बाबां शिवाय जर मला सगळ्यात जास्त आधार जो कोणी दिला असेल आणि ज्यांचा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव असेल तर ते म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्षीरसागर madam यांचा...
मला अजूनही आठवताहेत ते दिवस, त्या वेळी शाळेची फी भरायलाही आमच्याकडे पैसे नसायचे. पण madam मला कधीच अडवायच्या नाहीत. उलट दर वर्षी वह्या- पुस्तके मला madam कडून मिळायचे... ग्रंथालयातील पुस्तकासाठी वर्गांचे 'वार' ठरलेले असायचे, पण 'प्रसाद कुलकर्णी' कुठल्याही वारी कोणतेही पुस्तक घेऊ शकायचा आणि तेही थेट मुख्याध्यापिकाच्या नावावर...
त्यांनी जे प्रेम दिले, जी शिकवण दिली त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी असेल... आज जरी जास्त पैसे कमवत नसलो किंवा आता जरी फार काही हाती नसले तरीही तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक चांगला माणूस व्हायचा नक्कीच प्रयत्न करतोय madam .. !!!

मजा नाही येत...!!!

घरी भावंडांमध्ये जर तुम्ही सगळ्यात मोठे असाल, तर नक्कीच तुमचीही लहानपणी माझ्यासारखीच फजिती होत असणार...
माझ्या घरात सगळ्या भावंडांमध्ये मी मोठा... बऱ्याच वेळा माझा लहान भाऊ आणि बहिण खोड्या करायचे आणि मार मला खावा लागायचा... तसं मी स्वतःच्या खोड्यांमुळे पण भरपूर मार खायचो... tongue emoticon पण कधी- कधी माझी चूक नसतानाही मला मार खावा लागायचा... तक्रार आई-बाबांपर्यंत गेली कि हे दोघे एक व्हायचे आणि मला एकट्याला खिंडीत गाठायचे. त्यामुळे घरचे पण त्यांच्यावरच विश्वास ठेवायचे आणि वरून मलाच बोलायचे, ' ते दोघे लहान आहेत. तू मोठा घोडा आहेस तुला कळत नाही का?'
साला, आता खोड्या करायला पण वेळ नाही आणि घरचे पण मारत नाहीत... मजा नाही येत...!!! 

अगर तुम मिल जाओ...

दहावीला असताना एमआयडीसी मध्ये मी रूम घेतली होती... रूम वर सुरुवातीला फार बोअर व्हायचे म्हणून मी घरून आमचा जवळ-जवळ १०-१२ वर्षे जुना असलेला 'एफएम' आणलेला होता...
त्यावेळेस नुकताच 'झहर' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता... सिनेमा काही आम्ही पाहिलेला नव्हता tongue emoticon पण त्यातील श्रेया घोशालच्या आवाजातले 'अगर तुम मिल जाओ...' हे गाणे आम्हाला (मला आणि 'प्रीतम कुटे'ला) फार आवडायचे... दिवसातून ३-४ वेळा तरी ते 'विविधभारती'वर लागायचे... आणि आम्ही प्रत्येक वेळेस ते ऐकायचो ('एफएम' दिवसभर चालूच smile emoticon )
त्यानंतर काही दिवसांनी प्रीतम ने कॉम्प्युटर घेतला, आणि आम्ही पहिल्यांदा हे गाणे त्यात 'भरले'... मी एक दिवस प्रीतमच्या घरी "अभ्यासाला" गेलो आणि ते गाणे प्रत्येक ओळीला 'रियल प्लेयर' pause करून लिहून काढले... आणि नंतर पाठ केले (नंतर मग मी सारखाच प्रीतमच्या घरी "अभ्यासाला" जायला लागलो smile emoticon ) भूमितीमधली प्रमेय देखील मी कधी इतकी मन लाऊन पाठ केली नसतील, तितकी गाणी पाठ केली... tongue emoticon
असे म्हणतात कि माणूस ज्या परिस्थिती असतो, तशा प्रकारची गाणी त्याला आवडतात.... आता 'आम्ही' कोणत्या परिस्थितीत होतो ते स्पष्टीकरण देऊन सांगायला नको..

तु

तुझ्या काही गोष्टी मला खटकत असतीलही कदाचित...आणि त्याबद्दल माझी काही एक तक्रार नाहीये... कारण तुला तर आहे तसंच स्वीकारले आहे मी...!!!

कायदा

या देशात कायदा आहे फक्त सामान्य माणसांसाठी... उद्योगपती, सेलेब्रिटी आणि नेते मंडळीसाठी त्या न्याय देवतेने 'डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे'.

खोटारडे साले

सगळ्या गोष्टींचे अर्थ तुम्ही तुम्हाला पाहिजेत तसे आणि तुमच्या सोयीने लावा... समोरच्याच्या बोलण्याचे तुम्हाला वाट्टेल तसे अर्थ काढा... कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता पाहिजेल तसे व्यक्त व्हा...कोणालाच अजिबात समजून घेऊ नका... तुमचे म्हणणे रेटून पुढे न्या... खोटारडे साले !!!