Tuesday 9 December 2014

साला, मी काही करू शकत नाही....

रोज उठून तेच-तेच प्रश्न मनात घर करतात,
सर्वच नाहीत पण किमान गोष्टी तरी सर्वांना का नाही मिळतात?

एकीकडे इतके कपडे आहेत कि कोणते घालू म्हणून गोंधळ,
तर दुसरीकडे  काय घालायचे याची विवंचना....

एकीकडे माणसे कमी आणि घरासमोर महागड्या गाड्या असंख्य,
तर दुसरीकडे फाटके आभाळ हेच घर...

एकीकडे ब्रांडेड शूज आणि चप्पल्स साठी हट्ट,
तर दुसरीकडे अनवाणी पायांनी जीवनाचे थैमान...

एकीकडे दिवसाचे हजारो रुपये खाण्यावर उडवणारे,
तर दुसरीकडे त्यांच्या उष्ट्या अन्नावर जगणे...

एकीकडे शाळेसाठी लाखो रुपये डोनेशन भरणारे,
तर दुसरीकडे पाटी आणि  पेन्सील चीही नाही कुवत....

एकीकडे दारूचा महापूर,
तर दुसरीकडे साध्या पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन-मैल वणवण...

का आहे हा एवढा विरोधाभास, कोण आहे याला जबाबदार?
एकीकडे  सधन आणि सशक्त,
तर दुसरीकडे भकास, ओसाड पडीक माळरान....

साला, आपल्याला काय करायचेय म्हणून स्वतःला रोज समजावण्याचा प्रयत्न करतोय,

पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच समोर नाचत असेल,
तर मनाची खोटी समजूत तरी कशी काढू?

वैतागते मन हे सगळे पाहून, आणि त्याहून जास्त वैताग येतो याचा कि,
साला, मी काही करू शकत नाही....

पराजित सैनिकासारखा खाली मान घालून जगण्याशिवाय,
साला, मी काही करू शकत नाही....

समोर जे चाललाय ते कळत असूनही डोळ्यावर कातडी ओढून घेण्याशिवाय,
साला, मी काही करू शकत नाही....

मित्र म्हणतात कि प्रसाद, तू नेहमी दुःखच का लिहित असतोस?
पण जगात एवढे दुःख दिसत असताना ते लिहिण्याशिवाय,
साला... मी काही करू शकत नाही....


- प्रसाद कुलकर्णी

Tuesday 26 August 2014

आई-बाबा अन मी...

आई-बाबा अन मी...

खडतर दिवस मागे पडल्यासारखे होतील,
चांगले दिवस यायला सुरुवात होईल,
थोडाफार पैसाही खिशात खळ-खळेल....

लग्न होईल नवा संसार थाटला जाईल,
आणि या सगळ्यात आई-बाबांकडे जरा दुर्लक्ष होईल....

मला माहित आहे, त्यांनी माझ्यासाठी त्यांचे आयुष्य खर्ची केले आहे,
मला माहित आहे, त्यांनी माझ्यासाठी किती त्याग केला आहे,
आणि ते या सगळ्या गोष्टी शब्दाने देखील व्यक्त करणार नाहीत हेही मी जाणतो,

कदाचित मला उद्या त्यांची गरज कमी पडेल,
पण त्यांना माझी गरज जास्त असेल,
आणि असेही होऊ शकते कि मी जरा बेफिकीर बनेल...

तेंव्हा माझ्या मित्रा..... तेंव्हा माझ्या मित्रा....
माझ्या खाडकन कानामागे लावायला मागे पुढे पाहू नकोस,
जेणेकरून त्यांचे समर्पण एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून जाईल,
मन धाड्कन जागे होईल,  मेंदू ठिकाणावर येईल,
आणि परत एकदा....
आणि परत एकदा, ते माझे आणि मी त्यांचा होऊन जाईल...

Monday 14 July 2014

या एका पावसात....

ती कित्येक वर्षांनी भेटलीय मला या अशा दिवसात,
अन भावनांचा बांध फुटला माझा… या एका पावसात....
लहानपणी हातात हात घेऊन खेळलो आम्ही त्या मागच्या अंगणात,
पण नशिबान वेगलो झालो…. अशाच एका पावसात....
तिच्यासाठी धडपडलो मी कित्येक अशा वर्षावात,
भेटेल मला परत ती, हीच एक भाबडी आशा,… त्या हर-एक पावसात....
आज समोर उभी आहे ती, अन शब्द फुटत नाहीत ओठात,
न बोलताही मन भिडली… या एका पावसात....
भिजलेले केस तिचे ज्वालाग्नी पेटवताहेत माझ्या मनात,
थर-थरते अंग तिचे कंप करतेय मला… या एका पावसात...
ती जवळ आहे माझ्या इतकी, कि विरघळलीय ती माझ्यात,
अन माझे अश्रू विरघळताना दिसताहेत मला....या एका पावसात....
- प्रसाद कुलकर्णी

Tuesday 18 March 2014

आणि तू सारखं म्हणतेस कि, "तुझं माझ्यावर प्रेम नाही.... "


हृदयाची  तर माझ्या धड-धड तूच आहेस,
श्वास तर माझा प्रत्येक तूच आहेस,
तुझ्या शिवाय तर प्राणही माझा, माझा नाही
आणि तू सारखं म्हणतेस कि, "तुझं माझ्यावर प्रेम नाही.... "

दिवस-रात्र मनाला फक्त तुझाच ध्यास आहे,
तू असशील तर, मी माझ्यासाठीच खास आहे,
तुझ्या शिवाय एकही स्वप्न, स्वप्न नाही....
आणि तू सारखं म्हणतेस कि, "तुझं माझ्यावर प्रेम नाही ...."

तू नसशील तर मला भान नाही जगाचे,
तू नसशील तर मला नाही जगायचे,
तुझ्या विचारांहून वेगळा विचार करायला मला वेळ नाही....
आणि तू सारखं म्हणतेस कि, "तुझं माझ्यावर प्रेम नाही... "

बोलून दाखवले तरच ते प्रेम असते, हे मला माहित नाही,
आणि तसे सांगणं मला जमेल, याची मला खात्री नाही,
पण एक नक्की सांगतो, तुजविण जगणे माझ्यासाठी जगणे नाही....
आणि तू सारखं म्हणतेस कि, "तुझं माझ्यावर प्रेम नाही... "


कसं सांगू तुला, तुझ्या प्रेमात मी पुरता गुरफटलोय,
कसं सांगू तुला कि, ते सांगण्याची हिम्मतही मी हरवलोय,
पण माझं दुर्दैव कि, सांगता माझे प्रेम तुला कळत नाही....

आणि तू सारखं म्हणतेस कि, "तुझं माझ्यावर प्रेम नाही... "

Monday 3 February 2014

कृतज्ञता

लहानपणी जेंव्हा आम्ही सुट्टीला गावाला जायचो,
वाटेने अखंड वाहणारी "भीमा" आम्ही पाहायचो....
आई-बाबा पटकन चार आणे काढून द्यायचे,
आणि बस मधून आम्ही ते  नदीत टाकायचो....
नदीत पैसे का टाकतात हे त्या चिमुकल्या हातांना कळायचे नाही,
आणि आता तर , नदीत पैसे टाकतात हेच आठवणीत नाही....
परत-परत तोच प्रश्न मनात घोळतोय,
खरच का टाकतात नदीत पैसे....?
नदी म्हणजे जीवन...
दुसऱ्यांसाठी वाहणारे....
अडथळे पार करत जाणारे....
थांबणारे, दमणारे...
नि:स्वार्थीपणे सर्वस्व गमावणारे....
आणि शेवटी सागरात सामावणारे....
याची जाणीव  म्हणून तर टाकत नसतील नदीत पैसे...?
आज धावत्या काळाबर आम्ही हे सारे विसरलोय,
कदाचितकृतज्ञता” नावाची आमची नदीच आटलीय,

"पवना" ओलांडताना हीच भावना मनात दाटलीय......

Monday 13 January 2014

केजरीवाल

मुख्यमंत्री  झाल्यापासून फक्त एकदा जनता दरबार घेतला आणि तोही वायफळ ठरला.... लगेच केजरीवाल  साहेबांनी जाहीर केले कि "नो मोर जनता दरबार..... ". आता म्हणताहेत लोकांनी त्यांच्या समस्या मेल करा.... केजरीवाल  साहेब आठवड्यातून एकदाच लोकांना भेटणार आहेत.... आणि या भेटीत समस्या सोडवल्या जाणार नाहीत..... नंतर ते महिन्यातून एकदा भेटतील.... नंतर वर्षातून एकदा....आणि मग शेवटी बाकी राजकारण्यांच्या पंगतीत येउन बसतील.....केजरीवाल साहेबांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली म्हणायचे......