Tuesday 4 August 2015

धर्म...निष्पाप लोकांचा

निष्पाप हिंदू आणि मुसलमान लोकांना मारणाऱ्याला आता कळले असेल दुःख काय असते. निरपराध माणसांना मारले तेंव्हा याला दुःख झाले नाही, बघू आता याच्या भावाला लटकवल्यावर याला दुःख होते का? मरणाऱ्यांना "धर्म" नव्हता, मारेकऱ्याचा "धर्म" काढणाऱ्यांना पण असेच लटकावले पाहिजे...

कलाम सर...तुम्हाला मानाचा मुजरा

"त्या" एका माणसाने, त्याच्या कामाने सगळ्यांना "धर्म" विसरायला भाग पाडले... जाती-धर्माची कुंपणे तोडून हजारो "माणसं" त्याच्या शेवटच्या प्रवासात त्याच्या सोबत चालली.... अजून काय कमवायला पाहिजे आयुष्यात? कलाम सर तुम्हाला मानाचा मुजरा....

म्हणे देशातले लोक सुधारले...

मुली लग्नाला आल्या कि बापाच्या काळजात धस्स होतंय... जमिनी विकून मुलींची लग्नं लावली जाताहेत... स्वतःला सुशिक्षित(?) म्हणणाऱ्यांचे (हुंड्याचे) रेट पाच आही दहा लाख ठरताहेत... आणि कुठून तरी समाज सुधारल्याचे सूर ऐकू येताहेत... म्हणे देशातले लोक सुधारले...!!!

"ती" पिढी अन "ही" पिढी !!!

पूर्वीच्या गाण्यांमधले जिंदगी, दोस्ती, संघर्ष, वतन, देश यांसारखे शब्द ऐकून 'ती' पिढी लढायला शिकली...
आणि आताची पिढी पार्टी, आंटी, बॉटल आणि दारू हे शब्द ऐकून पिऊन पडायला...

भारतीय वंशाचा !!!!

भारतीय 'वंशाचा' माणूस अमेरिकेत राज्यपाल झाला, भारतीय 'वंशाची' कोणी स्त्री आकाशात काही दिवस राहिली, भारतीय 'वंशाचा' कोणी उद्योगपती कुठल्यातरी यादीत आला, भारतीय 'वंशाच्या' कोणाला तरी नोबेल मिळाले... कधी थांबवणार आहे हा भिकारडेपणा आपण... साला मला एक कळत नाही, हे 'भारतीय वंशाचे'च का कुठेतरी झळकतात? साले 'भारतीय' का कुठेच नाहीत? आणि इथले लोकही त्याचा इतका उदो-उदो का करतात? खरे तर या झळकणाऱ्या माणसांना 'भारतीय वंशाचा' या गोष्टीचा कितपत अभिमान असतो माहित नाही.. मला तर वाटते त्यांना याचे देणे-घेणेही असत नाही... आम्ही मात्र उगाच 'भारतीय वंशाचा' म्हणून उड्या मारतो... खोडच आहे आमची ती जुनी...!!!

महासत्ता

एकीकडे कॅलरीज जाळण्यासाठी लोक स्विमिंग करताहेत, जीम लावताहेत, सकाळी उठून धावताहेत....तर दुसरीकडे 'काही' कॅलरीज मिळवण्यासाठी लोक सिग्नलवर भिक मागताहेत... आणि देश महासत्ता होतोय...!!!

अलिया भट

'अलिया भट'च्या विद्वत्तेविषयीचे विनोद ऐकून होतो... पण माझ्या आस-पास अशा किती 'अलिया भट' आहेत ते आज ज्ञात झाले... असाच एकाने आज मुलींना प्रश्न केला कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? आणि चक्क एकाही मुलीला सांगता आले नाही... तुम्ही म्हणताल काय फेकतोय, पण खर सांगतोय तिघींपैकी एकीलाही सांगता आले नाही... गुगल सर्च करायला लागल्या... काय दुर्दैव आहे, ज्या राज्यात राहतो त्याचा मुख्यमंत्री कोण ते माहित नाही... गावाकडे शेंबड्या पोराला विचारले तरी ते सांगेल... 'अमेझोन'वर कोणती ऑफर चालू आहे विचारले तर सुरु झाली यांची वायफळ बड-बड सुरु... 'आयटी'मध्ये काम करतोय याचा अर्थ असा आहे का, कि तुम्हाला बाकी विषयांचे काही देणे-घेणे नाही?

शाळा अन मी....

ऑफिसच्या शेजारीच एक शाळा आहे. खिडकीचा पडदा जरा बाजूला सारला कि मैदानावर खेळणारी पोरं दिसतात आणि मी नकळत भूतकाळात हरवून जातो...
शाळेत २ किंवा ३ फुटबॉल असायचे. त्यातही एखाद-दुसरा पंक्चर असायचा. 'पीटी' चा तास सुरु झाला रे झाला कि आम्ही स्टोअर रूम वर आक्रमण केल्यासारखे तुटून पडायचो... मैदानावर आले कि 'बारामती' विरुद्द 'भिगवण' अशा दोन टीम मध्ये वर्ग एका मिनिटात आपो-आप विभागाला जायचा आणि सुरु व्हायचे एक 'थैमान' !!!
चौथ्या मजल्यावरून मी त्या मुलांकडे एकटक बघत राहतो. बारीक-सारीक आठवणी मनात 'खेळायला' लागतात आणि तेवढ्यात आवाज येतो, "चल पिके, बिझनेस सोबत कॉल आहे. काम अर्धवट राहिले आहे".

क्षीरसागर madam

आई-बाबां शिवाय जर मला सगळ्यात जास्त आधार जो कोणी दिला असेल आणि ज्यांचा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव असेल तर ते म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्षीरसागर madam यांचा...
मला अजूनही आठवताहेत ते दिवस, त्या वेळी शाळेची फी भरायलाही आमच्याकडे पैसे नसायचे. पण madam मला कधीच अडवायच्या नाहीत. उलट दर वर्षी वह्या- पुस्तके मला madam कडून मिळायचे... ग्रंथालयातील पुस्तकासाठी वर्गांचे 'वार' ठरलेले असायचे, पण 'प्रसाद कुलकर्णी' कुठल्याही वारी कोणतेही पुस्तक घेऊ शकायचा आणि तेही थेट मुख्याध्यापिकाच्या नावावर...
त्यांनी जे प्रेम दिले, जी शिकवण दिली त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी असेल... आज जरी जास्त पैसे कमवत नसलो किंवा आता जरी फार काही हाती नसले तरीही तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक चांगला माणूस व्हायचा नक्कीच प्रयत्न करतोय madam .. !!!

मजा नाही येत...!!!

घरी भावंडांमध्ये जर तुम्ही सगळ्यात मोठे असाल, तर नक्कीच तुमचीही लहानपणी माझ्यासारखीच फजिती होत असणार...
माझ्या घरात सगळ्या भावंडांमध्ये मी मोठा... बऱ्याच वेळा माझा लहान भाऊ आणि बहिण खोड्या करायचे आणि मार मला खावा लागायचा... तसं मी स्वतःच्या खोड्यांमुळे पण भरपूर मार खायचो... tongue emoticon पण कधी- कधी माझी चूक नसतानाही मला मार खावा लागायचा... तक्रार आई-बाबांपर्यंत गेली कि हे दोघे एक व्हायचे आणि मला एकट्याला खिंडीत गाठायचे. त्यामुळे घरचे पण त्यांच्यावरच विश्वास ठेवायचे आणि वरून मलाच बोलायचे, ' ते दोघे लहान आहेत. तू मोठा घोडा आहेस तुला कळत नाही का?'
साला, आता खोड्या करायला पण वेळ नाही आणि घरचे पण मारत नाहीत... मजा नाही येत...!!! 

अगर तुम मिल जाओ...

दहावीला असताना एमआयडीसी मध्ये मी रूम घेतली होती... रूम वर सुरुवातीला फार बोअर व्हायचे म्हणून मी घरून आमचा जवळ-जवळ १०-१२ वर्षे जुना असलेला 'एफएम' आणलेला होता...
त्यावेळेस नुकताच 'झहर' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता... सिनेमा काही आम्ही पाहिलेला नव्हता tongue emoticon पण त्यातील श्रेया घोशालच्या आवाजातले 'अगर तुम मिल जाओ...' हे गाणे आम्हाला (मला आणि 'प्रीतम कुटे'ला) फार आवडायचे... दिवसातून ३-४ वेळा तरी ते 'विविधभारती'वर लागायचे... आणि आम्ही प्रत्येक वेळेस ते ऐकायचो ('एफएम' दिवसभर चालूच smile emoticon )
त्यानंतर काही दिवसांनी प्रीतम ने कॉम्प्युटर घेतला, आणि आम्ही पहिल्यांदा हे गाणे त्यात 'भरले'... मी एक दिवस प्रीतमच्या घरी "अभ्यासाला" गेलो आणि ते गाणे प्रत्येक ओळीला 'रियल प्लेयर' pause करून लिहून काढले... आणि नंतर पाठ केले (नंतर मग मी सारखाच प्रीतमच्या घरी "अभ्यासाला" जायला लागलो smile emoticon ) भूमितीमधली प्रमेय देखील मी कधी इतकी मन लाऊन पाठ केली नसतील, तितकी गाणी पाठ केली... tongue emoticon
असे म्हणतात कि माणूस ज्या परिस्थिती असतो, तशा प्रकारची गाणी त्याला आवडतात.... आता 'आम्ही' कोणत्या परिस्थितीत होतो ते स्पष्टीकरण देऊन सांगायला नको..

तु

तुझ्या काही गोष्टी मला खटकत असतीलही कदाचित...आणि त्याबद्दल माझी काही एक तक्रार नाहीये... कारण तुला तर आहे तसंच स्वीकारले आहे मी...!!!

कायदा

या देशात कायदा आहे फक्त सामान्य माणसांसाठी... उद्योगपती, सेलेब्रिटी आणि नेते मंडळीसाठी त्या न्याय देवतेने 'डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे'.

खोटारडे साले

सगळ्या गोष्टींचे अर्थ तुम्ही तुम्हाला पाहिजेत तसे आणि तुमच्या सोयीने लावा... समोरच्याच्या बोलण्याचे तुम्हाला वाट्टेल तसे अर्थ काढा... कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता पाहिजेल तसे व्यक्त व्हा...कोणालाच अजिबात समजून घेऊ नका... तुमचे म्हणणे रेटून पुढे न्या... खोटारडे साले !!!

एक नजर

काही लोक नजरेतून उतरल्यावर त्यांच्याकडे पाहू वाटत नाही... जरी ते कितीही सुंदर दिसत असले तरीही...

Monday 6 April 2015

क्षुद्र

अहंकाराची लेबल स्वताःच स्वतःला चिटकून जगतो आपण,
किती फालतू आणि संकुचित साले आपण,
मुळात व्यापकपणाच आपल्याला माहित नाही,
किती 'क्षुद्र' जीवन जगतो आपण...

चार 'बुकं' वाचून विद्वान होतो आपण,
सूट-बूट घालून जेंटल-मन होतो आपण,
विचार मात्र 'दरिद्री' आपले,
किती 'क्षुद्र' जीवन जगतो आपण...

दुर्बलावर हात उगारून पराक्रमी होतो आपण,
चार दमड्या हाती आल्यावर धनाढ्य होतो आपण,
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे भिकारडे साले,
किती 'क्षुद्र' जीवन जगतो आपण...

प्रसाद कुलकर्णी ( एक वातकुकुट)...


Wednesday 1 April 2015

भावना

माझा गावाकडचा माझा एक मित्र आहे... आमच्या शेजारीच राहतो..आठवीला आहे.. तो हि आता फेसबुकवर आलाय.. मी ऑन-लाईन आल्यावर त्याचा मला मेसेज आला.. आय मिस यु दादा.. त्याने मेसेज इंग्रजीत पाठवला... त्यात तीन चुका होत्या... तरीही त्याला काय म्हणायचे आहे ते मला कळले... आणि मग मी विचारात पडलो... शब्द महत्वाचे कि 'भावना'? ... शब्द कदाचित चुकतील परंतु भावना कधीच नाही...आणि मग भावना समजण्याचे मनाशी ठरवले...

भारी माणूस होता !!

मला बाकीच्या लोकांसारखे आयुष्य नाही जगायचे... माणसे जन्माला येतात.. मोठी होतात... लग्न करतात... मुलांना वाढवतात...flat घेतात.. कार घेतात.. आयुष्यभर EMI भरतात... आणि मरतात...मला तर असे काही करायचेय कि, भिकारी होऊन जरी मेलो तरी लोक म्हणाले पाहिजेत कि, 'साला भारी माणूस होता'...

Monday 30 March 2015

Mission Submission

सगळ्यांच्या files चेक करून झाल्यावर मग आमची write-ups लिहण्याची तयारी सुरु व्हायची...  सोमनाथ बनकर write-ups गोळा करून आणण्याचे काम करायचा... मग सगळे 'मातोश्री' वर जमा व्हायचे... महेश यादव आणि सोहन गुणे कुठून तरी प्रिंटरची व्यवस्था करायचे... रवींद्र सिनारे कडे printout pages, 'बाबा'चा फोटो असलेले write-up pages, files आणि index pages गोळा करण्याची जबाबदारी असायची...
रात्री जेवण झाल्यावर १० वाजता सगळे मातोश्रीमध्ये बसायचे... ते write-up चे कागद सगळ्या रूम मध्ये अस्ताव्यस्त पसरायचे... कोण कुठल्या विषयाचे, कशाचे write-up लिहितोय पत्ता नसायचा... आणि सचिन शिंदे च्या फोनवर ' लव गुरु ' बडबडत असायचा..
एखादे write-up १० पानांचे असेल तर 'बन्न्या' त्याला ७ पानांत उरकायचा आणि तेहि दोन शब्दांमध्ये एक बोट अंतर सोडून...
मी ते ५ पानांत गुंडालायचो आणि 'बारक्या' तर फक्त ३ च पाने file ला जोडायचा...
'बाब्या' हा ग्रुप मधला सगळ्यात बिंधास्त माणूस… साल्याचे write-ups आम्ही लिहायचो… प्रिंट्स आम्ही काढायचो आणि हा बोंबलत हिंडायचा...
दुसरी रात्र प्रिंट्स काढण्यासाठी आरक्षित असायची... ग्रुप मध्ये आम्ही १० जण, त्यामुळे एकाच प्रोग्राम च्या १० प्रिंट्स काढाव्या लागायच्या... स्वप्नील रायफले आणि मी प्रिंट्स काढायला बसायचो.. मी प्रिंट द्यायला तर स्वप्न्या पेपर लावायला... रात्रभर प्रिंटरची कुर-कुर सुरु असायची... प्रिंटर वर काम करणाऱ्यांची शिफ्ट दर २ तासांनी बदलायची... आणि शेवटी  'मोत्या' सगळ्यांना त्यांच्या- त्यांच्या प्रिंट्स वाटून द्यायचा...

दोन दिवसांच्या 'अथक' मेहनतीनंतर खरी मजा यायची ती file चेक करताना... १० जण पन्हाळकर madam च्या समोर चेहरे पाडून रांगेत उभे राहायचे... साले मलाच पुढे उभे करायचे… माझ्या file  मध्ये काही चूक असली आणि madam नी मला हाकलले कि मागचे सगळे 'आपो-आप' गायब व्हायचे... कारण सगळ्यांनी एकच write-up छापलेले असायचे... कधी कधी तर कहर व्हायचा.. दहाही जणांच्या प्रोग्राम च्या description मध्ये एकाचेच नाव असायचे...:)

Thursday 19 March 2015

साधी माणसं

का माहित नाही पण 'माणसं' हा शब्द मला कायमच भुरळ घालत आलाय. वेग-वेगळ्या माणसांना मला पाहायला आवडते... त्यांना भेटायला आवडते... त्यांच्याशी गप्पा मारत बसायला आवडते... कधी-कधी ओळखीच्या माणसांपेक्षा 'अनोळखी' माणसांना मी माझ्या बऱ्याच गोष्टी सांगून जातो... माझ्या आजू-बाजूला असणारी ही 'साधी माणसं' कायमच माझ्या जगण्याची उर्जा बनत आली आहेत....
- प्रसाद कुलकर्णी (एक वातकुकुट)