Thursday 18 February 2016

तू आणि मी

मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या... शब्द साधे आहेत, कुठे चुकलो तर समजून घ्या...
तू डोळे, मी काजळ
तू डोंगर, मी नदी
तू ढग, मी वारा
तू कमळ, मी चिखल...
तू रस्ता मी दिशा
तू श्वास, मी ध्यास
तू पाऊस, मी छत्री
तू ऊन, मी सावली...
तू टेबल, मी खुर्ची
तू अंगठी, मी बोट
तू चंद्र, मी तारा
तू मांजर, मी कुत्रा...
तू फळा, मी खडू
तू सवय, मी खोड
तू सुई, मी दोरा
तू चष्मा, मी नाक...
तू ऍक्टिवा, मी डिस्कवर
तू मायक्रोमॅक्स, मी मोटोरोला
तू टेस्टर, मी डेव्हलपर
तू कर्वेनगर, मी चंदन नगर...
तू घड्याळ, मी टिक टिक
तू चिमणी, मी काजळी
तू माठ, मी तिवई
तू माचीस, मी काडी...
तू समुद्र, मी आभाळ
तू थंडी, मी ऊब
तू हृदय मी धड धड
तू सूर, मी ताल...
तू शब्द, मी अर्थ
तू जांभई, मी झोप
तू स्वप्न, मी भास
तू पापणी, मी पाणी...
तू शिंक, मी सर्दी
तू कट्टा, मी गप्पा
तू वाळू, मी खोपा
तू लाट, मी किनारा...
तू रुसवा, मी थट्टा
तू अबोला, मी समजूत
तू ओठ, मी थर-थर
तू भेट, मी ओढ
तू प्रतीक्षा... मी तळमळ...

- प्रसाद पांडुरंग कुलकर्णी

Tuesday 4 August 2015

धर्म...निष्पाप लोकांचा

निष्पाप हिंदू आणि मुसलमान लोकांना मारणाऱ्याला आता कळले असेल दुःख काय असते. निरपराध माणसांना मारले तेंव्हा याला दुःख झाले नाही, बघू आता याच्या भावाला लटकवल्यावर याला दुःख होते का? मरणाऱ्यांना "धर्म" नव्हता, मारेकऱ्याचा "धर्म" काढणाऱ्यांना पण असेच लटकावले पाहिजे...

कलाम सर...तुम्हाला मानाचा मुजरा

"त्या" एका माणसाने, त्याच्या कामाने सगळ्यांना "धर्म" विसरायला भाग पाडले... जाती-धर्माची कुंपणे तोडून हजारो "माणसं" त्याच्या शेवटच्या प्रवासात त्याच्या सोबत चालली.... अजून काय कमवायला पाहिजे आयुष्यात? कलाम सर तुम्हाला मानाचा मुजरा....

म्हणे देशातले लोक सुधारले...

मुली लग्नाला आल्या कि बापाच्या काळजात धस्स होतंय... जमिनी विकून मुलींची लग्नं लावली जाताहेत... स्वतःला सुशिक्षित(?) म्हणणाऱ्यांचे (हुंड्याचे) रेट पाच आही दहा लाख ठरताहेत... आणि कुठून तरी समाज सुधारल्याचे सूर ऐकू येताहेत... म्हणे देशातले लोक सुधारले...!!!

"ती" पिढी अन "ही" पिढी !!!

पूर्वीच्या गाण्यांमधले जिंदगी, दोस्ती, संघर्ष, वतन, देश यांसारखे शब्द ऐकून 'ती' पिढी लढायला शिकली...
आणि आताची पिढी पार्टी, आंटी, बॉटल आणि दारू हे शब्द ऐकून पिऊन पडायला...

भारतीय वंशाचा !!!!

भारतीय 'वंशाचा' माणूस अमेरिकेत राज्यपाल झाला, भारतीय 'वंशाची' कोणी स्त्री आकाशात काही दिवस राहिली, भारतीय 'वंशाचा' कोणी उद्योगपती कुठल्यातरी यादीत आला, भारतीय 'वंशाच्या' कोणाला तरी नोबेल मिळाले... कधी थांबवणार आहे हा भिकारडेपणा आपण... साला मला एक कळत नाही, हे 'भारतीय वंशाचे'च का कुठेतरी झळकतात? साले 'भारतीय' का कुठेच नाहीत? आणि इथले लोकही त्याचा इतका उदो-उदो का करतात? खरे तर या झळकणाऱ्या माणसांना 'भारतीय वंशाचा' या गोष्टीचा कितपत अभिमान असतो माहित नाही.. मला तर वाटते त्यांना याचे देणे-घेणेही असत नाही... आम्ही मात्र उगाच 'भारतीय वंशाचा' म्हणून उड्या मारतो... खोडच आहे आमची ती जुनी...!!!

महासत्ता

एकीकडे कॅलरीज जाळण्यासाठी लोक स्विमिंग करताहेत, जीम लावताहेत, सकाळी उठून धावताहेत....तर दुसरीकडे 'काही' कॅलरीज मिळवण्यासाठी लोक सिग्नलवर भिक मागताहेत... आणि देश महासत्ता होतोय...!!!